ONLY FOR YOU

Friday, May 13, 2022

* मरण *


                 * मरण *

मरणा मरणा थांब जरा,

मला थोडं चांगलं काही तरी करुदेत .

आतापर्यंत सर्व घेण्याचं काम केलं,

आता थोडं देण्याचं करुदेत .

 

गरिबांना लुबाडलं,

दुबळ्यांना छळलं त्यानां लुटलं.

पैसे , गाडी , बंगला

सर्व काही मिळवलं.

 

असे मिळवताना हे “मरणा”

तुझा विचारच आला नाही मनात .

पण समोर तू आल्यावर

आलो आहे आता भानात .

 

मग थोडं थांब ना

मला माझा स्वार्थीपणा सोडू देत .

अन सर्वांची निःस्वार्थीपणे

मनापासून सेवा करू देत .


अनाथांचा पालक होऊ देत ,

आंधळ्यांची काठी होऊ देत .

गरिबांचा अन्नदाता होऊ देत ,

वृद्धांना मायेची सावली देऊ देत .

 

प्राणी ,पक्षी ,झाडे यांच्यावर

नितांत प्रेम करुदेत .

हे सर्व  करून मला

थोडं समाधान मिळवू देत .

 

मग तू मला ने ,

हे मरणा थांबशील ना ?

माझ्या पापाचं प्रायश्चित्त

मला  करू देशील ना ?

 

*रुपाली काकडे*


 

        * आई रोजच करते तुला सलाम *

 

असली जरी तू मजपासून दूर तरी तुझ्या

दुधाची ऊर्जा अजूनही अंगात संचारते आहे .

तुझ्या आशीर्वादाची शक्ती

मला अजूनही बलवान बनवते आहे .

 

बालपणीचे पाजलेले कडू आता

अमृताहूनही गोड लागत आहे .

तू दिलेल्या संस्कारापुढे

सर्वकाही शुन्यच वाटत आहे .

 

तुझ्या मुळेच माझ्या पंखांना

ताकद येते आहे.

तुदिलेल्या शिकवणी मुळेच

जीवनाला दिशा मिळते आहे .


तूच  माझा पहिला गुरु

अन माझ्या आयुष्याचा दिवा आहेस .

तू म्हणजे माठातील थंडगार पाणी

अन मनाला देणारा गारवा आहेस .

 

तू संघर्षातला सोबती अन

जीवनाला आकार देणारा कुंभार आहेस.

मग तूच सांग आई

एका शब्दात तुझा कसा होईल बर सत्कार ?

 

तुझी महिमा तर रोज गाण्यासारखी ,

तिला नसतो कोठेही विराम .

मातृदिनादिवशी नव्हे

तर रोजच करते तुला सलाम .

 

                  *रुपाली काकडे*